म न पा    टोल फ्री नंबर :- 1800 1030 222

म न पा सोशल @  

     

मॅग्नम ओपस स्मार्ट रेन ट्रकर द्वारे पुणे शहरात पावसाची ‘स्मार्ट’ नोंद


'आपत्ती व्यवस्थापना'तर्फे शहरात पंधरा ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापके


   शहराच्या विविध भागांमधील पावसाची सद्यस्थिती आणि पर्जन्यमानाची नेमकी आकडेवारी आता 'लाइव्ह' समजू शकणार आहे. पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे शहरात पंधरा ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक (स्मार्ट रेन ट्रॅकर- एसआरटी) बसवण्यात आले असून, मोठ्या पावसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. मोठा पाऊस सुरू असताना 'एसआरटी'कडून पावसाची आकडेवारी थेट संबंधित अधिकाऱ्यांना 'एसएमएस'द्वारे मिळणार असल्याने तत्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

   पुण्याच्या पावसाच्या नोंदी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) शिवाजीनगर, पाषाण आणि लोहगाव येथून घेतल्या जातात. या शिवाय राज्य सरकारच्या पर्जन्यमापकांद्वारे शिवाजीनगर, कोथरूड, केशवनगर आणि हडपसर येथे दैनंदिन पावसाची नोंद होते. मात्र, पर्जन्यमापन यंत्रणेच्या अभावी शहराच्या इतर भागांमध्ये पडणाऱ्या पावसाची आकडेवारी कधीच समजत नाही. गेल्या काही वर्षांत मोठ्या पावसाच्या काळात शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ऑक्टोबर २०१० मध्ये शहरात गेल्या शतकातील विक्रमी १८२.३ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पाषाण परिसरात पावसामुळे रामनदीला पूर येऊन राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) अग्निमित्र बॅनर्जी हा संशोधक वाहून गेला होता. नदी आणि ओढ्याकाठी असणाऱ्या सोसायट्यांचे मोठे नुकसान झाले होते. जून २०१३ मध्ये कात्रज बोगद्याजवळ आलेल्या 'फ्लॅश फ्लड'मध्ये मायलेकींना आपला जीव गमवावा लागला होता. मान्सून काळात घडणाऱ्या अशा घटनांदरम्यान तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला 'एसआरटी'चा उपयोग होणार आहे.

   पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला या प्रकल्पाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वयंचलित पर्जन्यमापके गेल्या वर्षी बसवण्यात आली. पावसाचा जोर वाढू लागल्यावर दर तीन तासांनी, तर अतिवृष्टीसारख्या घटनांदरम्यान दर तासाला सर्व केंद्रांवरून पावसाच्या नोंदी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे मिळतात. तसेच, www.pune.maharain.org                ;            वेबसाइटवरही अद्ययावत नोंदी सर्वांना पाहता येतील.

मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनामध्ये, तसेच पूर नियंत्रण आराखड्यामध्ये पावसाच्या प्रमाणानुसार संबंधित भागातील अधिकाऱ्यांसाठी कामे नेमून देण्यात आली आहेत. पावसाच्या चालू नोंदी समजल्यामुळे अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करणे शक्य होत आहे.'

   'स्मार्ट रेन ट्रॅकर'द्वारे २१ जूनला नोंदवलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

औंध ६६ घोले रस्ता ३७.५ कर्वेनगर/ वारजे ३८.५ कोथरूड ३३.५ ढोलेपाटील रस्ता ४५
येरवडा/ संगमवाडी ६८ नगर रस्ता / वडगाव शेरी २०.५ भवानी पेठ ४४ कसबा पेठ / विश्रामबाग वाडा ४९ टिळक रस्ता ३७.५
सहकार नगर २५.५ हडपसर १५.५ कात्रज / धनकवडी ३२